राममंदिर ते राष्ट्र मंदिर

जय श्रीराम

II राममंदिर ते राष्ट्र मंदिर II

५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माणाचे भूमिपूजन झाले. भारताच्या इतिहासात या घटनेची नोंद सुवर्णाक्षरांनी करावी अशी ही घटना आहे. जवळपास पाच शतकांच्या संघर्षांत स्वतंत्र भारतात प्रांत-भाषा-जात-पात-पंथ भेद विसरून संघटित जनमताद्वारे लोकतांत्रिक मार्गांनी प्रयत्न झाले. त्यात रक्त सांडावे लागले. तरीदेखील हिंदू समाजाने अत्यंत संयमाने दीर्घकालीन न्यायलयीन प्रक्रियेची संयमाने प्रतीक्षा केली. सर्वोच्च न्यायालयाच्या नोव्हेंबर २०१९ मधील निकालाने या न्याय्य मागणीवर शिक्कामोर्तब केले.

राममंदिर निर्माणसाठी समाजाच्या सर्व स्तरातून देशव्यापी निधी संकलन अभियान सुरू आहे. या अभियानात सहभागी कार्यकर्ते श्रीरामाप्रती असलेली श्रद्धा अनुभवत आहेत.निधीसंकलन अभियानात प्रकट होणारा श्रद्धा आणि स्वाभिमानाचा हा महाप्रचंड हुंकार संख्यात्मकदृष्ट्या देखील विक्रम नोंदवणार आहे.अर्थात धर्माचार्यांच्या एकमुखी इच्छेनुसार विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून श्रीरामजन्मभूमी मुक्त करून त्यावर भव्य मंदिराची निर्मिती करणे एवढाच या संघर्षाचा हेतू नव्हता. त्यामुळे निधीसंकलन होऊन भव्य मंदिर निर्माण होणे हा कळसोध्याय केवळ अपेक्षित नाही.

मनात अयोध्या साकारणे

श्रीरामजन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष पू.स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी अयोध्या ही जगाची सांस्कृतिक राजधानी व्हावी असे म्हंटले आहे॰भूमिपूजन कार्यक्रमात रा.स्व.संघाचे पू.सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी बोलताना, मंदिर उभे राहीपर्यंत प्रत्येक भारतीयाच्या “मनात अयोध्या” साकार करण्याचे आवाहन केले आहे. संत तुलसीदास यांच्या दोह्याचा उल्लेख त्यांनी केला.

प्रभू रामचंद्रांची अयोध्या….

काम कोह मद मान न मोहा I लोभ न छोभ न राग न द्रोहा II

जिन्हके कपट दंभ नाही माया I तिन्ह के हृदय बसहूं रघुराया II

अशी असते.

मनाची अयोध्या कशी असावी? दोषांपासून व विकारांपसून मुक्त व संस्कारांनी युक्त, व्यक्तीगत चारित्र्ययुक्त समाजव्यवस्था उभी राहणे.राष्ट्रीय वृत्ती(राष्ट्रीय चारित्र्ययुक्त) साठी समाजव्यवस्था उभी करणे॰ त्यासाठी या संस्कारांची व्यवस्था करणे.वर्तमान परिस्थितीत आवश्यक सक्षम समाज उभा करणे, हे करणे म्हणजे “मनाची अयोध्या निर्माण करणे” होय.

राष्ट्रमंदिर

म्हणजेच, केवळ श्रीराममंदिराचे भव्य निर्माण असा मर्यादित संकल्प नसून, श्रीराम मंदिराच्या आधारावर राष्ट्रमंदिर उभारणे असे ध्येय आहे.एका विशाल नैसर्गिक भूभागात पिढ्यांपिढ्या राहणार्‍या जनसमूहाची एक संस्कृती,एक जीवनपद्धती आणि त्यातून निर्माण होणारी सांस्कृतिक एकता व परस्पर आत्मीयभाव ही सर्व एका राष्ट्राची वैशिष्ठ्ये आहेत॰ श्रीराम मंदिर उभे करण्यासाठी प्रत्येक समजघटकाकडून निधी मिळावा अशी अपेक्षा आहे. तसेच राष्ट्रमंदिरासाठी देखील प्रत्येक समाजघटकाकडून काही ना काही निधी समर्पित होणे आवश्यक आहे. येथे पैसा देणे असा विषय नाही. येथे या देशचे अंगभूत घटक म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य अपेक्षित असते.

ज्येष्ठ विचारवंत श्री रमेश पतंगे यांनी राष्ट्रमंदिराचे समरसता,सामाजिक सुरक्षा,सद्भाव निर्मिती,पर्यावरण सुरक्षा असे चार खांब आहेत असे प्रतिपादन केले आहे.

समरसता

राष्ट्रमंदिर उभारणी करताना त्या राष्ट्रातील सर्व समाज आत्मीय भावनेने जोडलेला असणे आवश्यक असतो. त्यातून होणारा परस्पर व्यवहार हा बंधुभावने होतो. त्यात सामाजिक विषमता नष्ट होण्यास मदत होते.कोणीही अस्पृश्य नाही ही भावना निर्माण होते. आम्ही सर्व एका आईची लेकरे आहोत, या भावनेचे प्रकटीकरण म्हणजे बंधुभाव होय.समरस समाज ही राष्ट्रमंदिराची महत्वाची अपेक्षा आहे.

सामाजिक सुरक्षा

अन्न,वस्त्र,निवारा,आरोग्य,शिक्षण इत्यादि मानवाच्या प्राथमिक गरजा आहेत. या प्राथमिक गरजा पूर्ण करताना सरकार म्हणून काही भूमिका असतेच.परंतु सर्व काही सरकार करेल अशी समाजाची मानसिकता असणे योग्य नव्हे. आपल्याकडे समाजातील अशा गरजा पूर्ण करण्यास सहाय्य करणारे व्यक्ति-संस्था आहेत. त्यातील अनेकजण हे काम धर्मार्थ म्हणून श्रद्धेने करण्याची आपली परंपरा आहे. कर्तव्य भाव म्हणून समाजात अशी प्रेरणा व्यवस्था वृद्धिंगत करणे हे सामाजिक सुरक्षा म्हणून आवश्यक आहे.

सद्भाव निर्मिती

आपल्या देशात उपासना,पंथ,संप्रदाय इत्यादीच्या आधारे खूप वैविध्य आहे. परंतु हे सर्वजण ईश्वराचे अस्तित्व मान्य करतात. तसेच कौटुंबिक व सामाजिक व्यवहारात नीतीतत्वांचा आग्रह धरतात. त्यामुळे हे वैविध्य आपापसातील भेदाचे कारण नसावे. या वैविध्याच्या अंतर्गत सुप्त एकतेचे दर्शन घडते. या वैविध्याला टिकवून परस्पर सद्भाव वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.परस्परांच्या एकत्र येण्याने या आंतरिक एकतेचे दर्शन अधिक प्रखरतेने जाणवते. हा सद्भाव वाढविणे आवश्यक आहे.

पर्यावरण सुरक्षा

आपल्या परंपरेत व्यष्टि-समष्टि-सृष्टी-परमेष्टी म्हणजेच व्यक्ति-समाज-निसर्ग-परमेश्वर असे परस्पर पूरक नाते मानलेले आहेत. त्यातील सृष्टीमध्ये सर्व पशू-पक्षी व पर्यावरण यांचे संरक्षण एका भावबंधाने जोडलेले आहे.आपले अनेक सण-उत्सव-परंपरा याचे महत्व दर्शवणार्‍या आहेत. पर्यावरण संरक्षणाचे आव्हान व महत्व आता सर्वांच्याच लक्षात आले आहे. सृष्टीतील जैव विविधता जपणे आवश्यक आहे. जल-जंगल-जमीन यांचे संरक्षण अपेक्षित आहे.

समरसता,सामाजिक सुरक्षा,सद्भाव निर्मिती,पर्यावरण सुरक्षा यासाठी विविध व्यक्ति व संस्था प्रयत्न करीत आहेतच. त्याची प्रसादचिन्हे देखील दिसत आहेत. म्हणूनच अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणाच्या निमित्ताने समाजात जी एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे.त्याआधारे समाजबांधव अधिक संख्येने व अधिक गतीने यात सहभागी व्हावेत अशी कल्पना आहे. श्रीराम मंदिर ते राष्ट्रमंदिर अशी ही संकल्पना आहे.

लेखक – दिलीप क्षीरसागर

पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख, रा.स्व.संघ