राष्ट्र मंदिराच्या उभारणीसाठी आपलाही हातभार लागू द्या
मंदिर निर्माणात प्रत्येक व्यक्तीचा सहभाग हवा
स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दीच्या वेळी विवेकानंद शिला स्मारक समितीतर्फे कन्याकुमारी येथील समुद्रात असलेल्या खडकावर स्वामीजींचा पुतळा व भव्य स्मारक उभे करण्यासाठी असेच मोठे अभियान हाती घेतले होते. या अभियानाच्या वेळी देशभरातल्या प्रत्येक व्यक्तीकडून किमान सव्वा रुपया मागितला गेला होता. अशाप्रकारे सव्वा रुपया देणारे दहा कोटी पेक्षा अधिक नागरिक त्यावेळी आपण होऊन पुढे आले होते. याशिवाय मोठा निधी देणारे अनेक भाविक होते. याप्रकारे समाजातल्या प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचा भावनात्मक संबंध विवेकानंद मंदिराशी जोडला गेला. राम जन्मभूमी मुक्ती संघर्ष उपक्रम चालू होता, त्यावेळी राम मंदिराच्या कामासाठी प्रत्येक गावातून एक वीट पूजन करून अयोध्येकडे पाठवावी असा कार्यक्रम दिला गेला. देशातल्या साडेतीन लाख गावातून समारंभपूर्वक पूजन करून अयोध्येकडे विटा पाठविण्यात आल्या. तेव्हापासूनच देशातले प्रत्येक गाव भावनेने अयोध्या राम मंदिराशी जोडले गेलेले आह.. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून मंदिर उभारण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडे किमान दहा रुपये निधी मागणे अशा स्वरूपाचा कार्यक्रम यावेळी हाती घेतला जाणार आहे. अशा उपक्रमातून प्रभू रामा सारख्या सर्वांची समान श्रद्धा असलेल्या दैवताच्या मंदिरासाठी देशातल्या प्रत्येक माणसाचे योगदान प्राप्त होईल. सर्वसामान्य माणसाला सहभागी होता यावे यासाठी दहा रुपये ,शंभर रुपये, व एक हजार रुपयांची कुपने वितरित करण्यात येतील. त्यापेक्षा मोठा निधी देणाऱ्यांसाठी स्वतंत्र पावती पुस्तके छापलेली आहेत. या निधी संकलनासाठी केंद्रीय अर्थ विभागाकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या रीतसर घेण्यात आलेल्या आहेत.
एखादी रेष न पुसता लहान करायची असेल, तर तिच्या शेजारी तिच्या पेक्षा मोठी रेषा काढणे हाच पर्याय असतो. आपल्या देशात जाती, पंथ , धर्म, भाषा, प्रांत रितीरिवाज, परंपरा, यांची प्रचंड मोठी विविधता आहे. दुर्देवाने यापैकी काही विविधतांचे रूपांतर भेदभावांमध्ये झाले, व त्यामुळे मागच्या काही वर्षांमध्ये समाजाच्या वेगवेगळ्या गटात भिंती निर्माण झाल्या. या भिंती दूर करून, समाजातील सर्व भेदभाव विसर्जित करून, सर्व समाज एकत्रितपणे राष्ट्रकार्यासाठी उभा करण्याची अयोध्येतील राम मंदिर ही फार मोठी संधी आपणास प्राप्त झालेली आहे. कारण आपसातील भेदभाव काहीही असले, तरी प्रभू रामाप्रती असलेली श्रद्धा सर्वांची समान आहे. या श्रद्धेचा उपयोग करून घेऊन मंदिर निर्माणाच्या मार्गाने आपली आंतरिक एकात्मता अधिक दूर करणे, व राष्ट्रीय स्वाभिमान जागृत करणे, असे फार मोठे कार्य आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने घडून येणार आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे मोल कधी पैशांमध्ये करता येत नाही. या कामात सर्व 130 कोटी भारतीयांनी यथाशक्ती योगदान करावे, अशी प्रार्थना .
राम, कृष्ण व शिव राष्ट्रीय एकात्मतेची प्रतीके
ज्येष्ठ विचारवंत राम मनोहर लोहिया यांनी राष्ट्रीय एकात्मते संबंधी आपले विचार अत्यंत समर्पक शब्दात मांडले आहेत. त्यांनी असे म्हटले आहे, राम, कृष्ण व शिव या तीन दैवतांनी भारताची राष्ट्रीय एकात्मता साधलेली आहे. रामाने उत्तरेतील जनकपुरीपासून दक्षिणेतील श्रीलंकेपर्यंत हजारो किलोमीटर प्रवास केला व उत्तर-दक्षिण भारत जोडण्याचे काम केले. श्रीकृष्णाने द्वारकेमध्ये आपली राजधानी वसवली व अति पूर्वेला प्राग्ज्योतिषपूर म्हणजे गोहाटी पर्यंत जाऊन नरकासुराचा वध केला. त्याने पूर्व-पश्चिम भारत जोडण्याचे काम केले. भगवान शिवाची तीर्थक्षेत्रे व पार्वती मातेची शक्तिस्थळे संपूर्ण देशभरात पसरलेली आहेत. शिवाने सर्व भारतच व्यापला आहे. जोपर्यंत भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर आहे, तोपर्यंत राम, कृष्ण व शिव हे एकात्मतेचे बंध या संस्कृतीतील विविधतेतून राष्ट्रीय एकात्मता साधत राहतील. भारतीय राज्यघटनेनेही राष्ट्रपुरुष म्हणून रामाला मान्यता दिली. घटनेच्या मूळ प्रतीमध्ये धनुर्धारी रामाचे चित्र अंकित केलेले आहे.
दुर्देवाने राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून राजकारण्यांनी रामाकडे कधी पाहिले नाही. राम हिंदूंचा देव आहे त्यामुळे रामासंबंधी गौरवाने बोलले तर आपल्या सेक्युलर भूमिकेला बाधा येईल, अशा खुळचट कल्पना घेऊन चाललेल्या राजकीय पक्षांनी राम हा काही इतिहास पुरुष नव्हे, इथपर्यंत आपल्या अकलेचे तारे सुप्रीम कोर्टात जाऊन तोडण्याचे काम केले. परंतु भारतीय जनमानसात राम खोलवर जाऊन रुजलेला आहे. ज्यांनी ज्यांनी रामाला रामराम केला, त्यांना त्यांना भारतियांनी राम म्हणायला लावले. मुलायम सिंग यादव हे स्वतःला राम मनोहर लोहिया यांचे शिष्य म्हणवतात पण त्यांनाही राष्ट्रीय एकात्मते संबंधी लोहिया यांनी व्यक्त केलेले विचार समजले नव्हते. ज्या मतांच्या लालसेने समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांनी अयोध्येत कार सेवकांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला व ती नाकेबंदी तोडून अयोध्येत आलेल्या कारसेवकांवर गोळीबार केला, त्या मुलायम सिंग यांचा पक्ष आता जनतेने उत्तरप्रदेशात नगण्य करून टाकलेला आहे. ज्या काँग्रेसने रामसेतू तोडण्याची परवानगी दिली, ज्या काँग्रेसने सुप्रीम कोर्टात ॲफडेविट करून रामाचे अस्तित्व नाकारले, ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक होईपर्यंत राम मंदिराचा खटला चालवू नये व निकाल लावू नये अशी सुप्रीम कोर्टात विनंती केली त्या काँग्रेसची सर्व देशभर दुरवस्था होऊन गेलेली आहे. त्रेतायुगातल्या रामाने सोडलेले बाण आज कलियुगात देखील भल्याभल्यांना घायाळ करू शकतात, ही आश्चर्याची गोष्ट आहे. परंतु त्रेतायुगातील राम कलियुगात देखील राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी प्रभावी आधार ठरू शकतो, ही मात्र वस्तुस्थिती आहे.
परंतु राम हा राष्ट्रपुरुष होता की नाही हे काँग्रेसला किंवा मुलायमसिंग यांना कदाचित समजले नसेल, परंतु ते बाबराला निश्चित समजलेले होते. जोपर्यंत राम, कृष्ण व शिव यांच्यावरच्या श्रद्धा भारतीयांच्या मनात ठामपणे बसलेल्या आहेत, तोपर्यंत आपण पण आपले राजसिंहासन पक्के करू शकणार नाही, भारतीय जनमानसावर राज्य करू शकणार नाही, भारतीय जनमानस गुलाम करू शकणार नाही, हे बाबराला व औरंगजेबासह सर्व मोगल बादशहाना चांगले समजत होते. म्हणूनच बाबराचा सेनापती मीर बाकी याने अयोध्येवर हल्ला करून राम मंदिराचा विध्वंस केला व त्या मंदिरावर मशीद उभारण्याचा प्रयत्न केला. कृष्ण व शिव हे राष्ट्रीय श्रद्धेने विषय होते, म्हणूनच औरंगजेबाने काशी व मथुरा येथील मंदिरे उद्ध्वस्त केली, आणि त्या मंदिराच्या जागेवर मशिदी उभारल्या.
राष्ट्रीय अस्मितेच्या पुनरस्थापनेसाठी राममंदिर
मोगल आक्रमकांनी हजारो वर्षे चालत आलेल्या राष्ट्रीय अस्मितेवर आघात केलेला होता, व तो आघात दूर करण्याचा एकमेव मार्ग उध्वस्त झालेली मंदिरे पुन्हा त्याच स्थानावर उभारणे हा होता. भारतात मंदिरांची कमी नाही. भारतात कमी आहे ती राष्ट्रीय स्वाभिमान असलेल्या नागरिकांची. परकीयांनी अपमान केला तरी चालेल, आपण परक्यांना दुखायला नको. आपल्या धर्माचा अपमान कोणी करत असेल, तरीही त्याचा बदला घ्यायला नको, अशा भेकड मानसिकतेत आपला समाज दीर्घ काळ राहिला, म्हणूनच त्याला हजार वर्षे गुलामी सहन करावी लागली. राष्ट्रीय अपमानाचा बदला घेण्याची ईर्षा जनमानसात निर्माण झाली असती, तर या परकीय आक्रमकांना हिंदू सरदार मनसबदारांनी साथ देऊन त्यांचे साम्राज्य आपल्या डोक्यावर बसवून घेतले नसते. राष्ट्रीय स्वाभिमान असता तर पृथ्वीराज चव्हाण याला दगाफटका करून जयचंदने मोहम्मद घोरीला दिल्लीची सत्ता मिळवून दिली नसती. राष्ट्रीय स्वाभिमान असता तर मिर्झा राजे जयसिंग औरंगजेबाचा चाकर झाला नसता. राष्ट्रीय स्वाभिमान असता तर सरदार नातू यांनी इंग्रजांची गुलामी स्वीकारून शनिवार वाड्यावरचा भगवा झेंडा उतरवला नसता. त्यामुळे वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथाच्या मंदिराची मूळ जागी पुनर्स्थापना केली ती राष्ट्रीय अस्मितेच्या जागरणासाठीच. अयोध्येतील राम जन्मभूमीवर राम मंदिराची पुनर्स्थापना राष्ट्रीय स्वाभिमानाच्या प्रस्थापनेसाठीच आवश्यक आहे. विश्व हिंदू परिषदेने राम मंदिरासाठी प्रदीर्घ लढा दिला व देशभरातील कोट्यवधी हिंदू जनतेला राम मंदिराच्या लढ्यातून राष्ट्रीय स्वाभिमानाशी जोडले, तेव्हा कुठे सर्वोच्च न्यायालयातर्फे राम मंदिराच्या पुनरउभारणीचा मार्ग मोकळा झाला.
मुस्लिम आक्रमकांनी अयोध्या, मथुरा व काशी येथील श्रद्धास्थाने असलेली हिंदूंची मंदिरे तोडली. त्या प्रत्येक वेळी हिंदू समाजाने आक्रमकांना जबरदस्त प्रतिकार केला. आपल्या मंदिरांच्या रक्षणासाठी हजारो हिंदूंनी बलिदान दिले. अयोध्येच्या राम मंदिरासाठी देखील आजवर 76 लढाया झाल्या, व त्यात अक्षरशः लाखो हिंदूंचे रक्त सांडले. हा संघर्ष एका इमारतीच्या रक्षणासाठी नव्हता, तर हिंदू समाजाच्या श्रद्धास्थानाच्या रक्षणासाठी होता. हिंदू समाजावर मोगल आक्रमकांनी शेकडो वर्षे अन्याय गेला. देशभरात तीस हजारांहून अधिक हिंदू मंदिरे तोडली गेली आहेत. तरी जेव्हा जेव्हा हिंदू राज्यांची सरशी झाली, तेव्हा त्यांनी मशिदी तोडल्या नाहीत. मुस्लिम आक्रमकांनी हजारो हिंदूंना बळजबरीने मुसलमान केले. तरी विजयी झालेल्या हिंदू राजांनी बळजबरीने मुसलमानांना पुन्हा हिंदू करून घेतले नाही. मुस्लिम आक्रमकांनी हजारो हिंदू स्त्रियांचे अपहरण केले व त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. परंतु हिंदू राजे विजयी झाल्यावर त्यांनी कधीही मुस्लिम स्त्रियांच्या इज्जतीला धक्का लागू दिला नाही. हिंदू समाजाने आपल्या संस्कृतीच्या शिकवणीनुसार व आपल्या गौरवपूर्ण परंपरेनुसार सदैव व्यवहार केलेला आहे. अयोध्येतील जन्मस्थानावर असलेले मंदिर तोडून जिथे मशीद बनवायचा प्रयत्न केला होता, तो ढाचा हिंदू समाजाने 92 साली उध्वस्त केला, तो देखील सनदशीर मार्गाने न्याय मिळवण्याचे सर्व प्रयत्न विफल होत गेले तेव्हाच. तोपर्यंत हिंदू समाजाने सदैव संयम पाळला होता. बाबरी पडल्यावर मुंबईत व इतर अनेक ठिकाणी मुस्लिम दहशतवाद्यांनी बॉम्ब हल्ले केले, दंगली घडविल्या व हजारो निरपराध व्यक्तींच्या हत्या घडविल्या. तरीही हिंदू समाजाने आपला संयम कधीही सोडला नाही. हिंदू समाजाची ती संस्कृती नाही. परंतु जिथे आपल्या श्रद्धेचा अपमान झालेला आहे, त्या ठिकाणी आपल्या श्रद्धेय दैवतांची पुनर्स्थापना करणे हा मात्र पुरुषार्थाचा विषय आहे, व त्यासाठी हिंदू समाज सदैव संघर्षरत राहिला.
राम एक आदर्श व्यक्तिमत्व
प्रभू श्रीराम हे केवळ पराक्रमी पुरुष होते म्हणून त्यांना राष्ट्रपुरुष म्हटलेले नाही. त्यांचे वर्णन मर्यादापुरुषोत्तम असे केलेले आहे. हिंदू संस्कृतीतील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून रामाचा गौरवाने उल्लेख केला जातो. राम असामान्य पराक्रमाचे प्रतीक आहे. जनस्थाना मध्ये खर दूषण हे राक्षस 14 हजार सैनिक घेऊन आक्रमण करुन आलेले असताना एकट्या रामाने त्या सर्व राक्षसांचा संहार केलेला होता. जेव्हा सीतेचे अपहरण करून रावण लंकेत गेला त्यावेळी रामाला भरताकडून सैन्याची मदत मागवता आली असती. पण रामाने जंगलातील वानर जातीच्या एका अर्थाने अत्यंत उपेक्षित समाजाच्या सैन्याची मदत घेऊन स्वबळावर रावणाशी युद्ध केले. रामेश्वर पासून श्रीलंके पर्यंतचा रामाने बांधलेला पूल अगदी सोळाव्या शतकापर्यंत वापरात होता, व आजही त्या पुलाचे बरेच भाग जसेच्या तसे शिल्लक आहेत. हे अभूतपूर्व स्थापत्य कौशल्य रामाच्या वनवासी सैनिकांनी दाखवले, जे आजही एक जागतिक आश्चर्य मानले जाते. रावणाचे सैन्य प्रशिक्षित होते. सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होते.रामाला राक्षसांच्या राजधानीत जाऊन, परक्या भूमीत त्यांच्याशी युद्ध करायचे होते. परंतु अशा कोणत्याही साधनांची मदत नसताना व अप्रशिक्षित सैन्य घेऊन रामाने सर्व मायावी राक्षसांसह रावणाच्या सैन्याचा विनाश केला. रावणाचे सर्व अतिरथी महारथी राम व त्याच्या सहकाऱ्यांकडून मारले गेले, त्याचे अनेक गौरवपूर्ण उल्लेख रामायणात मिळतात.
आदर्श भाऊ, आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श राजा अशा विविध भूमिकांमध्ये रामाची प्रतिमा महर्षी वाल्मिकींनी वर्णन केलेली आहे. समाज नीतिमान राहायचा असेल तर त्याच्या समोर केवळ तत्वज्ञान सांगून चालत नाही, आदर्श जीवन जगलेल्या व्यक्ती त्याच्या समोर उभ्या कराव्या लागतात. रामायणातून असे अनेक आदर्श मानव समाजासमोर उभे केलेले आहेत. रामायण हे केवळ महाकाव्य म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या विद्वानांना रामायणात वर्णन केलेले नीतिशास्त्र, समाजशास्त्र, युद्धशास्त्र , तेथील प्रगत जनजीवन व अध्यात्म यांची पुरेशी जाणीव असत नाही. जगातील इतर देशांमध्ये जी तथाकथित महाकाव्ये आहेत, त्यातील नायक नायिकांचे वर्तनाची राम सीतेच्या आदर्श वर्तनाशी तुलना देखील करता येणार नाही. रामायणामध्ये रामाच्या नेतृत्व गुणांचे जे वर्णन केले आहे ते आजही एखाद्या नेत्याला अथवा समाज संघटन करणाऱ्या व्यक्तीला मार्गदर्शक ठरणारे आहे. इतिहासात घडणाऱ्या स्फूर्तीदायक घटनांचे परिशीलन नवीन पिढीला प्रेरणा देत असते असे म्हणतात. राजमाता जिजाऊंनी रामायणाच्या गोष्टी सांगून शिवाजी महाराजांच्या मनात स्वातंत्र्याची व पराक्रमाची प्रेरणा जागृत केली. अशी प्रेरणा देशभरातील हजारो युवक-युवतीनाआजवर प्राप्त झालेली आहे, व त्यातून आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास घडलेला आहे. रामाचे मंदिर हे आपल्या संस्कृतीच्या गौरवाचे मंदिर असेल, आपल्या गौरवशाली इतिहासाचे, आदर्शांचे, पुरुषार्थाचे व राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असेल. या मंदिराच्या उभारणीत आपला हातभार लागणे हा आपला गौरव आहे असे प्रत्येक भारतीयास वाटले पाहिजे.
मायावी राक्षसांपासून सावधान
रामायणामधील मायावी राक्षसांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. मारीच राक्षसाने सुवर्णमृगाचे रूप घेऊन खुद्द रामाला फसवले, व त्याच गोष्टीचा फायदा घेऊन रावणाने सीतेचे अपहरण केले, हा तर इतिहास आहे. वास्तविकते पासून रामाला दूर करून भ्रामक मोहजालात गुंतवून ठेवण्याचे काम कांचनमृगाने केले, कारण राम देखील हे मायावी रूप व त्यामागचा कुटील हेतू ओळखू शकला नाही. आजच्या युगात देखील वास्तविकते पासून समाजाला दूर नेणारे व भ्रामक मोहजालात गुंतवून ठेवणारे अनेक मायावी राक्षस आहेत. कधी ते धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा घेऊन येतात, कधी समाजवादाचा मुखवटा घेऊन येतात. कधी “भाकरीचा प्रश्न महत्वाचा की मंदिराचा?” असा प्रश्न अगदी भोळा भाव चेहर्यावर घेऊन आपल्यासमोर उपस्थित करतात. कधी ” कोरोना आपत्तीच्या काळात मंदिराला प्राथमिकता देण्याची आवश्यकता आहे का?” असा वरवर सालस वाटणारा प्रश्न विचारतात. यातल्या प्रत्येकाला समाजाचे लक्ष राष्ट्रीय स्वाभिमानाच्या मुद्द्यावरून दूर करायचे असते. हिंदू धर्म , हिंदू समाज व हिंदू संस्कृती यांचा विचार देखील सर्वसामान्य माणसाच्या मनात येता कामा नये, यासाठीच अशा काही ना काही शाब्दिक कसरती करून सामान्य माणसाचे लक्ष विचलित करणे, एवढेच या मायावी राक्षसांचे काम असते. प्रत्यक्ष राम मंदिर आंदोलनाच्या वेळी देखील हेच सर्व प्रश्न हे मायावी राक्षस वारंवार उपस्थित करत होते. राम मंदिराची समाजाला काही जरूरीच नाही असे भासवण्याचा प्रयत्न करत होते. राम मंदिराचा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल संघ व विश्व हिंदू परिषद यासारख्या संस्थांना अधिकाधिक बदनाम करण्याचा प्रयत्नही करत होते .
वस्तुतः हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजाचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी दोन लाखापेक्षा अधिक सेवाकार्ये आजही करतो आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, संस्कार, या मूलभूत आयामांशी संबंधित हजारो-लाखो कामे करतो आहे. झोपडपट्टीत राहणारा दुर्बल व्यक्ती, अपंग, अनाथ अथवा वृद्ध व्यक्ती, महिला, यांच्यासाठी अशी असंख्य सेवा कार्ये गेली अनेक वर्षे चालू आहेत. या कामात संघाचे अक्षरशः लाखो कार्यकर्ते पूर्णवेळ काम करत आहेत. त्यासाठी समाजातून कोट्यवधी रुपये जमा करून समाजाच्या विकासासाठी खर्चही करत आहेत. शासनावर अथवा अन्य कोणत्याही संस्थेवर अवलंबून न राहता आत्मनिर्भर होऊन समाजसेवा करत आहेत. देशावर भूकंप असो, वादळ असो, सुनामी असो, अथवा दुष्काळ असो, अशी कोणतीही आपत्ती आली तरी हजारो संघाचे कार्यकर्ते या सर्व आपत्ती काळात काम करताना दिसत असतात. पण समाजाच्या मूलभूत प्रश्नांसंबंधात संघ जे काम करतो, त्याकडे हे मायावी राक्षस दुर्लक्ष करतात. राष्ट्रीय आपत्तीच्या काळात संघ जे काम करतो त्याकडे हे मायावी राक्षस दुर्लक्ष करतात. त्यांचे लक्ष संघ अथवा विश्व हिंदू परिषद जेव्हा एखादा जनजागरणाचा उपक्रम करते, तेव्हा तिकडे जाते व त्यावरून समाजाचे लक्ष उडविणे यासाठी भ्रमजाल पसरवायला ते सुरुवात करतात. या मायावी राक्षसांना स्वतःला कुठले रचनात्मक कार्य करायचे नसते. पण रचनात्मक कार्य करणाऱ्या संघासारख्या संस्थांना बदनाम करणे एवढेच त्यांचे उद्दिष्ट असते. त्यामुळे राम मंदिर निर्माणाच्या कामात असे मायावी राक्षस आजही निरनिराळी विघ्ने आणतीलच यात मला तरी शंका नाही. पण या मायावी राक्षसांपासून सज्जन व सत्कार्ये यांचे रक्षण कसे करायचे, हे रामाने त्याच्या व्यवहारातून सिद्ध करून दाखवले आहे. त्याचे स्मरण केले तरीही ही सामान्य माणूस भरकटल्या सारखा होणार नाही.
विश्वभरात विख्यात असे पर्यटन स्थळ
अयोध्येतील जन्मस्थानावर निर्माण होणारे राम मंदिर हे केवळ प्रतीकात्मक बांधलेले छोटेसे मंदिर असणार नाही. प्रभू रामाच्या प्रतिष्ठेला साजेसे असे भव्य, आकर्षक व दिमाखदार मंदिर त्या ठिकाणी उभे राहणार आहे. मंदिराचे स्थापत्य हे प्राचीन मंदिराच्या धर्तीचे असणार आहे. या बांधणीत सिमेंटचा वापर केला जाणार नाही. प्रत्येक दगडावर उत्कृष्ट कोरीव काम केलेले असेल. असे शेकडो दगड व स्तंभ यांचे कोरीव काम यापूर्वीच पूर्ण करण्यात आलेले आहे. मंदिर निर्मितीची परंपरा असणारे सोमपुरा यांनीच मंदिराची आखणी व त्याची प्रतिकृती तयार केलेली आहे. सध्याच्या प्रस्तावित मंदिराचे एकूण निर्माण क्षेत्र सत्तावन्न हजार चारशे चौरस फूट असणार आहे. एकूण लांबी 360 फुट, रुंदी 235 फूट, व कळसापर्यंतची उंची 161 फुट असणार आहे . या मंदिराच्या रचनेत पाच मंडपाची रचना केलेली आहे. मंदिरात एकूण तीन मजले असतील व प्रत्येक मजल्याची उंची सुमारे वीस फूट एवढी असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पूर्वी विवादित असलेली सर्व 2.77 एकर जागा व व सरकारने अधिगृहित केलेली एकूण 67 एकर जागा ही सर्व राम मंदिराच्या कार्यासाठी निर्माण केलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडे सोपवण्यात आली आहे. मंदिराचे मुख्य बांधकाम सोडून उर्वरित परिसरात एक अतिभव्य प्रदर्शनी असेल, त्यात राम जन्मभूमि मुक्ती संघर्षाचा इतिहास दाखविलेला असेल. प्राचीन राम मंदिराचे जे अवशेष उत्खननात सापडले, तेही ठेवलेले असतील. रामायणातील प्रसंग भिंतींवर चित्रित केलेले असतील. याशिवाय भव्य भक्त निवास, भक्तांच्या सोयीसाठी आवश्यक असलेली स्वच्छतागृहे व पर्यटकांच्या सुविधेसाठी आवश्यक असलेल्या वाहनतळा सहित सर्व सुविधा उपलब्ध असतील. संपूर्ण जगात पर्यटकांना आकर्षित करून घेईल अशा पद्धतीने हा परिसर विकसित केलेला असेल. जगभरातून विमानाने येणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत सुसज्ज असा विमानतळ अयोध्येत उभारला जाईल. पूर्वीपासून जगातील आश्चर्ये पाहण्यासाठी, अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, इजिप्तमधील पिरॅमिड पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक जात असत. आता भारतातही अशी भव्य पर्यटन स्थळे विकसित होत आहेत. सरदार सरोवर परिसरात वल्लभभाई पटेल यांचा जो अति भव्य पुतळा उभारण्यात आला आहे, तो पुतळाही जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो आहे. अयोध्या येथील संकल्पित श्रीराम मंदिर हे त्याहीपेक्षा मोठे असे पर्यटन केंद्र बनेल व जगभरातील पर्यटकांच्या यादीवर ते केंद्र यापुढील काळात निश्चितपणे असेल.
मंदिराच्या उभारणीस सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याशिवाय मंदिराबाहेर असलेली मोठी प्रदर्शनी, भक्तनिवास, वाहनतळ व 67 एकर परिसरातील अन्य सर्व सुविधांच्या बांधकामासाठी मोठा खर्च होणार आहे. अयोध्येतील राम मंदिर परिसरात सभोवतालच्या दहा जिल्ह्यांचा विकास घडवणारे सेवा केंद्र निर्माण व्हावे अशी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची योजना आहे. दहा जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, आरोग्य केंद्रे, रोजगार प्रशिक्षण संस्था, त्याचबरोबर महिला, वृद्ध, बालकांच्या विकासासाठी विविध योजना तीर्थक्षेत्र न्यासाकरवी राबविल्या जातील. अयोध्या व भोवतालच्या परिसराचे सुशोभीकरण, शरयू नदी परिसराचे सुशोभीकरण, वाहतूक समस्यांचे निराकरण अशा अनेक योजना या सेवा केंद्रातून राबविल्या जाणार आहेत. या सर्व प्रकल्पासाठी सुमारे 2 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी संकलित केला जाण्याची अपेक्षा आहे. हा निधी सरकारकडून घेतला जाणार नसून सामान्य जनतेकडून संकलित केला जाणार आहे. जन्मभूमी न्यासातर्फे जानेवारी महिन्यामध्ये व्यापक निधी संकलन मोहीम हाती घेतली जाणार आहे. हिंदुत्वाच्या कोणत्याही अभियानास अपशकून करणाऱ्या देशातल्या काही विद्वानांना मंदिरासाठी 2000 कोटी रुपये खर्च करणे कदाचित अनावश्यक वाटू शकेल, त्याऐवजी तो निधी अन्य एखाद्या प्रकल्पासाठी वापरावा अशा सूचना करणारे पुष्कळ लोक पुढे येतील. समाजाच्या विकासाच्या अन्य कोणत्याही योजना राम मंदिरासाठी थांबवण्यात येण्याचे काही कारण नाही. या योजना शासकीय प्रकल्पातून पूर्वीप्रमाणेच राबविल्या जाणार आहेत. या सर्व योजना तशाच चालू ठेवून मंदिर निर्माणासाठी जनतेतून अतिरिक्त निधी उभारण्यात येणार आहे व या पुढील हजार वर्षे या मंदिराचा अभिमानाने हिंदू समाज उल्लेख करत राहील, असे एक उत्कृष्ट स्मारक या राम मंदिराच्या निमित्ताने उभे राहणार आहे. राम मंदिराची उभारणी करण्यासाठी समाजातला सर्वसामान्य माणूसही ही आनंदाने पुढे येईल. या निधी संकलनाची कोणावर सक्ती होणार नाही, अथवा त्याचे ओझे कोणावर ही पडणार नाही. केवळ पैशाच्या दृष्टीने विचार करायचा तर दरवर्षी केवळ राम मंदिराच्या दर्शनासाठी जगभरातून सुमारे 25 लाख पर्यटक येतील अशी अपेक्षा आहे. त्यांच्यामार्फत मंदिरात जे दान दिले जाईल याद्वारे भोवतालच्या 10 जिल्ह्यातील सर्व सेवाकार्ये देवालय स्वखर्चातून चालवू शकेल. पर्यटन व्यवसायामुळे अयोध्या परिसरातील हजारो गरीब नागरिकांना रोजगार मिळेल व परिसराचा विकास होईल. या अतिरिक्त फायद्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.